त्या’ रिक्षा चालकाने मागितली तरुणीची माफी

Foto
रिक्षा चालकाच्या असभ्य वर्तनाची तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीला दिलासा देण्याऐवजी ‘दमदार’ समजूत घालून तिचे प्रकरण ‘रफा-दफा’ करणार्‍या बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांचा प्रताप सांजवार्ताने बुधवारी (दि. 19) च्या अंकात प्रसिद्ध केला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कारवाईचा बडगा उगारताच सानप साहेब भानावर आले. त्यांनी गुरुवारी तत्परता दाखवित संबंधित रिक्षा चालकाला शोधून काढले आणि त्या तरुणीला बोलावून रिक्षा चालकाला तिची माफी मागायला लावलीच शिवाय नियमानुसार गुन्हाही दाखल केला.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास मुख्य बसस्थानक परिसरातील कार्तिकी हॉटेलसमोरुन दुचाकीवरुन जाणार्‍या तरुणीने वाहन कोंडीमुळे दुचाकी बाजूला घेतली. त्यामुळे चिडलेल्या पाठीमागच्या रिक्षाचालकाने भररस्त्यात त्या तरुणीला  आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली व धमकी देऊन निघून गेला. त्या तरुणीने रिक्षाचा नंबर टिपून ठेवला आणि बेगमपुरा परिसरात राहत असल्यामुळे तिने सरळ बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला.बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या केबिनमध्ये गेली. त्यांनी मला अजीबात वेळ नसल्याचे सांगून महिला कॉन्टेबलकडे पाठवले. त्या कॉन्स्टेबलला तरुणीने घडलेला प्रसंग सांगितला आणि संबंधित रिक्षाचालकाने (क्र. एम.एच.20 डी.सी. 1134) एका महिलेचा उपमर्द केल्यामुळे त्याला धडा मिळावा अशी विनंती केली. त्यावेळी घटना क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली त्यामुळे तिकडे जा, ‘इश्यू बनवू नका’ असा दमदार सल्‍ला तरुणीला देण्यात आला होता.

महिलेची तक्रार घेण्यास बेगमपुरा पोलिसांचा नकार

घाबरू नकाच !
शहर महिलांसाठी असुरक्षित बनू नये, यासाठी समाज माध्यमांसह अनेक पक्ष संघटना काम करू लागल्या आहेत. शहरात अंधारावर मात करू यासह महिला सुरक्षेसाठी अनेक कार्यक्रम होत आहेत. अशावेळी महिलांनी धाडसाने पुढे येण्याची गरज आहे. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. निर्भयपणे पोलिसात तक्रार द्यावी.
- संबंधित तरुण

‘सांजवार्ता’ची भूमिका
या सर्व प्रकरणात ‘सांजवार्ता’ची एक भूमिका आहे. तसे पाहिले तर ही घटना खूप लहान वाटेल. शहरातील रस्त्यावर अशा प्रकरच्या घटना दररोज किती तरी वेळा घडत असतात. पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे का? हा प्रश्‍न निर्माण होतो. पोलिस अशा प्रकारांमध्ये साधी तक्रारही नोंदवून घेत नाहीत. त्यामुळे नागरिक तक्रारी करण्यासाठी जातही नाहीत, अशी एकंदर परिस्थिती आहे. खरे तर कुणाही सर्वसामान्य नागरिकाची तक्रार छोटी जरी असली तरी ती पोलिसांनी स्वीकारली पाहिजे, संबंधिताला दिलासा दिला पाहिजे, अशा प्रकरणातील आरोपींना शिक्षाच दिली पाहिजे,असेही काही नाही.... पोलिसांचा ‘दम’ही खूप मोठे काम करून जातो. पण दखल घेतलीच पाहिजे आणि त्यातही एखादी महिला किंवा तरुणी तक्रार घेऊन येत असेल तर पोलिसांनी अशा प्रकरणात अजिबात हलगर्जीपणा करता कामा नये, असे ‘सांजवार्ता’ला ठामपणे वाटते. पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी या प्रकरणात जी तत्परता दाखवली त्याबद्दल ‘सांजवार्ता’ला अभिमान आहे, कौतुक आहे.   - संपादक